ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ्याच्या न्यू इंग्लिश स्कुल, शिरोली बुद्रुक येथे मंगळवार दि २५ रोजी बी. आय. एस. च्या (कि रिसोर्स पर्सन) रविंद्र ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली (एल एस व्ही एस)ची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक, मेंटर आणि स्टॅंडर्ड क्लबचे ६० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बी. आय. एस. मेंटर प्रियांका पादीर यांनी (स्टॅंडर्ड व्हाया सायन्स) या विषयाची माहिती सांगून केली. ननवरे यांचे स्वागत शिक्षक संतोष देवकुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात मयूर जगताप यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांना बी. आय एस. केअर ॲप बद्दल जनजागृती करण्यासंदर्भात सूचना दिल्या. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा मानकांचा विज्ञानाशी संबंध जोडणे, मानकांची गुणवत्ता तपासण्यासाठी विज्ञानाचा होणारा उपयोग विद्यार्थ्यांना समजावून देणे, मानकांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील विज्ञान शिकणे हा आहे. ननवरे यांनी सायकल आणि टायर या घटकांवरती आधारित LSVS ट्रेनिंग घेतले. विद्यार्थ्यांना स्टॅंडर्ड वॉच विषयीचे व्हिडिओ त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून क्विज घेण्यात आली. सायकल आणि टायर वरती आधारित पाठ योजनांमध्ये न्यूटनचे नियम, वेग अंतर काल यांचा सहसंबंध, जडत्व, संवेग थर्मो डायनामिक्स, एरोडायनॅमिक्स, इत्यादी वैज्ञानिक नियम, तत्वांची माहिती आणि या वस्तूंच्या निर्मितीसाठी त्याचा वापर कसा केला आहे. हे पीपीटी द्वारे समजावून सांगितले. पूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून, विविध नियम, तत्व यांची व्याख्या, माहिती इत्यादी विचारून विद्यार्थ्यांना सहभागी करून आनंददायी वातावरणात कार्यशाळा पूर्ण झाली. विद्यार्थ्यांना विज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष जीवनातील उत्पादनांमध्ये कसा होतो हे समजते म्हणजेच ते शैक्षणिक ज्ञानाला व्यवहारात जोडू शकतात. प्रत्येक घटकांनंतर विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे विचारून त्यांना कितपत समजले, याची खात्री करून घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि गुणवत्तेची जाणीव वाढण्यास नक्कीच मदत होईल. वेळोवेळी होणाऱ्या प्रश्नमंजुषा साठी याचा नक्कीच विद्यार्थ्यांना उपयोग होईल. कार्यक्रमाचे आभार विद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख रुपाली नलावडे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे येथील मूल्यमापन व संशोधन विभागाचे प्रमुख देशपांडे यांचे मार्गदर्शन तसेच बी. आय. एस पुणे शाखेचे स्टॅंडर्ड प्रमोशन अधिकारी हर्ष मोहन शुक्ला यांच्या माध्यमातून विद्यालयात बी. आय. एस चे विविध उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य लाभत असल्याचे मुख्याध्यापक हांडे यांनी सांगितले.