आळंदी : ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा आधारभूत ग्रंथ आहे. ती स्वतःची ओळख करून देते आणि समाजातील भांडणे मिटवण्याचे सामथ्यं ठेवते. बांधिलकी जपून समाजाला शांतीचा संदेश दिला पाहिजे. तसेच ज्ञानेश्वरी माणसाचे जीवन घडवते आणि वाचवते. ज्ञानेश्वरीच्या अध्यापनाने सुसंस्कृत पिढी घडवण्याचा संकल्प आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि आळंदी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षांपासून राबवल्या जाणाऱ्या ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सदानंद मोरे बोलत होते. महाराष्ट्रातील ८८ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. कार्यशाळेत पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षिका सहभागी झाल्या. यावेळी वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज जाधव, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, माजी विश्वस्त अर्थतज्ज्ञ डॉ. अभय टिळक, जनकाई स्वाध्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष महाराज गेठे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, सम्राट फडणीस, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राम मंदिराचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, प्राचार्य एस. जी. मुंगसे उपस्थित होते. डॉ. अभय टिळक यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरी पुस्तकातील ८ ते १६ धड्यांवर मार्गदर्शन करताना, शालेय जीवनात संस्कार रुजवून सुसंस्कृत पिढी घडवण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. सुभाष गेठे आणि डॉ. नारायण जाधव यांनी अनुक्रमे पहिल्या ८ आणि २४ ते ३२ धड्यांवर मार्गदर्शन केले, तर डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी १६ ते २४ घड्यांवर बोलताना अध्यात्म व विज्ञानाचा समन्वय साधण्याचे महत्त्व सांगितले. अजित वडगावकर यांनी प्रास्ताविक व गणेश लिखे यांनी सूत्रसंचालन केले, तर तुकाराम गवारी यांनी आभार मानले. ओळख श्री ज्ञानेश्वरी हा उपक्रम पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्ण सहकार्य करू. ज्ञानेश्वरी केवळ पारायणासाठी नसून, तिचे ज्ञान जीवनात उतरवणे महत्त्वाचे आहे. डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे