शालेय पोषण आहार कक्षातील अधिकाऱ्यांची 11 पदे रिक्तच : केवळ 6 पदे भरली
मीनाक्षी राऊत यांच्याकडेच पुन्हा अतिरिक्त कार्यभार
पुणे – शालेय पोषण आहार योजनेच्या सक्षम अंमलबजावणीसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या योजनेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण 41 नवीन पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील तब्बल 17 अधिकाऱ्यांच्या मंजूर पदापैकी केवळ सहा पदेच भरण्यात आली असून तब्बल 11 पदे रिक्तच आहेत. यातील काहीपदांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून कामकाजाचा गाडा पुढे ढकलण्यात येऊ लागला आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेची व्याप्ती मोठी असून योजनेच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरावर वेगळी यंत्रणा पूर्वी नव्हती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावर स्वंतत्र कक्ष निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. केंद्र शासनाने योजनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यास मान्यताही दिली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 6 मार्च 2017 रोजी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबत निर्णय घेऊन आदेशही काढले होते.
या कक्षासाठी 17 अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास मान्यताही देण्यात आली. कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची 24 पदे भरण्यासही मंजुरी देण्यात आलेली आहे. या कंत्राटींमध्ये 4 लघुलेखक, 10 डेटा एन्ट्री ऑपरेटर, 10 सपोर्ट स्टाफ आदींचा समावेश आहे.
राज्य समन्वयक अधिकारीपद रिक्तच असून त्याचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. वित्त व लेखाधिकारीपदी पूर्ण वेळ अधिकारी कार्यरत आहे. सहाय्यक संचालकांची 4 पदे मंजूर असून ती सर्वच्या सर्व रिक्तच आहेत. अधीक्षकांची 6 पदे मंजूर असून त्यातील 3 रिक्त आहेत. लेखापालाच्या 2 पदांना मान्यता असून त्यातील 1 पद रिक्त आहे. उपसंचालकांची 2 पदे मंजूर असून ती रिक्तच आहेत. त्यातील एका पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांच्याकडे शालेय पोषण आहार योजनेच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांनी शिक्षणआयुक्तांना दिले होते. त्यानुसार शिक्षणआयुक्त विशाल सोळंकी यांनी राऊत यांना अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानंतर राऊत यांनी तत्काळ कार्यभार स्वीकारला आहे. राऊत यांची महापालिकेत बदली झाल्यानंतर त्यांची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून 16 सप्टेंबर रोजी मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर आठवड्याभरात त्यांच्याकडे पुन्हा आणखी एका विभागातील प्रभारी सूत्रे देण्यात आली आहेत.