“अहिल्यादेवींच्या आदर्शानुसार काम’; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन

बारामती – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच कर्नाटक मधील सर्व महिलांना एसटीचा मोफत प्रवास दिला जात आहे. ऑगस्टपासून महिन्याला महिला कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर दोन हजार रुपये सरकार जमा करणार आहे, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने विश्वासराव देवकाते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती उत्सवाचे आयोजन शहरातील शारदा प्रांगण येथे केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी समाजभूषण पुरस्कार देऊन सिद्धरामय्या यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आर. व्ही. देशपांडे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, माजी आमदार आरजे रुपनवर, विजय मोरे, उत्तम जानकर, संजय जगताप, दिगंबर दुर्गाडे, पुरुषोत्तम जगताप, प्रमोद काकडे, मदनराव देवकाते, राजवर्धन शिंदे, किरण गुजर, संभाजी होळकर, सचिन सातव, जय पाटील उपस्थित होते. सिद्धरामय्या म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रशंसा जगभरात केली जाते. महिलांना शिक्षण मिळावे त्यांचे सबलीकरण व्हावे तसेच त्या सामर्थ्यवान व्हाव्यात यासाठी अहिल्यादेवी यांनी काम केले. कर्नाटकमध्ये सत्ता आल्यानंतर निवडणुका पूर्वी जनतेला जे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्ती केली. महाराष्ट्रात देखील कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकार आल्यानंतर अशा योजना लागू कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी पवार यांच्याकडे व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यसत्ता सामान्य जनतेसाठी राबवली. त्याचप्रमाणे हातात आलेल्या सत्तेचा उपयोग सिद्धारामया देखील सामान्य जनतेच्या सन्मानासाठी करीत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची नोंद कर्नाटकच्या जनतेने घेतले आहे. त्यांचा आदर्श आपण देखील घेतला पाहिजे. सूत्रसंचालन ज्ञानदेव बुरुंगले व कुमार देवकाते यांनी केले.
+++++++++++
बारामती टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
अजित पवार म्हणाले की, बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले आहे, ही बाब आनंदाचे आहे. नाव देण्यासाठी बारामतीकरांना देखील सोबत घ्यायला हवे होते. सरकारने परिपत्रक काढून मोठा तीर मारल्याचा आव आणू नये. अहिल्यादेवींच्या नावावरून आमच्या मनात कसलीही खोट नाही. ज्याप्रमाणे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण दिले आहे. त्याचप्रमाणे बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असते तर बरं झालं असतं. असे नाव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.





