Pimpri | कंपनीत कामगारावर कटरने वार

पिंपरी, – कंपनीतील कामगारावर त्याच्या सहकारी कामगाराने कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील महाळुंगे येथील वॅरॉक कंपनी येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी घडली. सचिन कमलेश राजपूत (वय २१, रा. महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २९) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किरण दशरथ आडे (वय २४, रा. आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी राजपूत हे कंपनीत काम करीत होते. त्यावेळी तिथे आरोपी किरण आडे हा आला. राजूतर यांच्याशी भांडण करु लागला. आडे म्हणाला की, कंपणीत तुम्ही सर्वजण माझ्या विषयी रोज बोलत असता, माझेकडे बघुन हसता.
त्यावेळी फिर्यादी राजपूत हा आरोपी आडे याला बोलला की, माझे काम करु दे. आम्ही तुझी चर्चा करत नाही. तुझा गैरसमज झाला आहे, असे बोलून ते काम करू लागले. त्यावेळी आरोपी आडे हा फिर्यादी राजपूत यांना मारहाण करू लागला. त्यामुळे राजपूत हे पळून जात असताना आरोपी आडे याने त्यांच्यावर कटरने वार केले. तसेच त्यांना ट्रे फेकून मारल्याने ते गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





