Satara | महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा

सातारा, (प्रतिनिधी) – लाेकसभेतील यशामुळे महाविकास आघाडीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आपापसात चर्चा करून ठरवा.
अन्यथा आगामी पंधरा दिवसात संभावित उमेदवारांचे नावे मी जाहीर करणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला विजय मिळवायचा असून राज्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा असल्याने सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केल्या.
राष्ट्रवादी भवनात आ.पाटील यांनी विधानसभा मतदार संघनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन मतदारसंघनिहाय आढावा घेतला. फलटण, वाई, कोरेगाव माण-खटाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण या विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीची माहिती जयंत पाटील यांनी घेतली.
यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संगीता साळुंखे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय बोबडे, गोरखनाथ नलावडे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष समिंद्रा जाधव, जिल्हाध्यक्ष संजना जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीतील कामाबाबतचे अवलोकनही करुन विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला लीड देण्यात वाटा उचलला आहे,
अशा कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीसाठी संधी द्यावी. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी बाजूला राहून नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांना संधी द्यायची झाल्यास त्यांना महत्त्वाची पदे दिली जाऊ नयेत, असा सूर बैठकीत पुढे आला.
वाई तालुकाध्यक्ष दिलीप बाबर, प्रसाद सुर्वे, विजयसिंह पिसाळ, डॉ. नितीन सावंत, निवृत्त संधी अधिकारी प्रभाकर देशमुख, सत्यजित पाटणकर, दीपक पवार, देवराज पाटील, चेतन शिंदे बाळासाहेब सावंत, सतीश चव्हाण, अशोक सस्ते, तेजस्विनी केसरकर, प्रज्ञा गायकवाड, रूपाली भिसे, सचिन जाधव आदींनी मते मांडली.
दरम्यान फलटण विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी प्रतिभाताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून या बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्या नियुक्त्या तात्काळ करण्याच्या सूचना आ.जयंत पाटील यांनी केल्या.
काठावर उभे राहणाऱ्यांचे टोचले कान
लाेकसभा निवडणुकीत काहींनी आज इकडे तर उद्या तिकडे अशा पध्दतीने काम केले. या बैठकीत अशा कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये काठावर उभे राहून पक्षाच्या उमेदवाराचे काम न करणे आता इथून पुढे असे चालणार नाही. तन, मन, धनाने पक्षाचे काम करणार नसाल तर बाजूला गेलात तरी चालेल, अशा शब्दांत आ. जयंत पाटील यांनी संबंधितांचे कान टोचले.





