रांजणी : बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून हे काम चांगल्या दर्जाचे करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे तळेघर ते निगडाळे हा रस्ता चांगल्या प्रतीचा होण्यास निश्चित मदत होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रृती नाईक यांनी हा रस्ता चांगल्या प्रतीचा होण्यासाठी जातीने लक्ष घातलेे आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आहे. वर्षभर राज्याच्या नवे तर देशातील कोट्यवधी भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येत असतात. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम चालू आहे. मात्र, हे काम चांगले होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन. तळेघर ते निगडाळे या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे करण्याचा मानस ठेवला आहे. त्यानुसार रस्त्याचे काम आता चांगल्या प्रतीचे होत आहे. दरम्यान, भीमाशंकरला जाण्यासाठी सर्व वाहतूक मंचर घोडेगाव, डिंभा तळेघर मार्गे श्री क्षेत्र भीमाशंकरकडे होते. येथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे या रस्त्याचे महत्व अधिक आहे. गेल्या सहा, सात महिन्यांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. उन्हाळ्यातील सुट्टीची गर्दी तसेच पावसाळ्यामुळे निसर्ग सौंदर्य वाढल्याने पर्यटकांची गर्दी कमी झाली असली तरी ती श्रावण महिन्यात वाढली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता या रस्त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रस्ता चांगला होण्यासाठी अधिकारी वर्ग जागरूक असल्याचे अधिक्षक अभियंता डी. बी. विभूते यांनी सांगितले. या रस्त्याला सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत. राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर ते निगडाळे या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता साडे तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. स्वत: वळसे पाटील यांनी या रस्त्याचे काम चांगले होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कामावर उपअभियंत्यांची देखरेख राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रृती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रेरणा कोटकर यांच्या देखरेखीखाली निगडाळे ते तळेघर रस्त्याचे काम चालू आहे. सध्या या रस्त्यावर बीएमकरण चालू असून त्यावर आणखी एक लेयर घेतला जाईल. पहिल्या लेयरला जरी खड्डे पडले असले तरी दुसऱ्या लेयरमुळे ते व्यवस्थित होतील असे उपअभियंता प्रेरणा कोटकर यांनी सांगितले.