नव्या संसद भवनाच्या इमारतीचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार

कमळ, मोराच्या थीमवर होणार होणार सुशोभीकरण

नवी दिल्ली : भारताच्या संसद भवनाच्या नव्या इमारतीचे काम सुरु करण्यात आले आहे. हे नवे संसद भवन २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. या भवनात जुन्या भवनाच्या तुलनेत अधिक जागा आणि सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर या भवनाला भारतीय टचही देण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या संसद भवनाच्या सुशोभीकरणासाठी राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ आणि राष्ट्रीय फूल ‘कमळ’ यांच्या प्रतिमा आणि भित्तीचित्रेही तयार करण्यात येणार आहेत. तर देशाचे राष्ट्रीय झाड ‘वड’ याची अनेक झाडं नव्या इमारतीच्या परिसरात लावण्यात येणार आहेत.

सध्याची वर्तुळाकार असलेली संसदेची इमारत ही सन १९२७ मध्ये बांधण्यात आली आहे. या इमारतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती १४४ खांबांवर उभारण्यात आली आहे. या इमारतीतही काही भारतीय पद्धतीची वैशिष्ट्ये दिसून येतात. ती म्हणजे या इमारतीच्या आतमध्ये आणि बाहेर कारंजे बसवण्यात आले आहेत. भारतीय पद्धतीच्या बाल्कनी आणि संगमरवराच्या जाळीसारखे पडद्यांच्या भिंतींचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.

नवी संसदेची इमारत ही सध्याच्या इमारतीच्या समोर उजव्या बाजूला बांधण्यात येणार आहे. यामध्ये समकालीन वस्तूंनी सुभोशिकरण करण्यात येणार आहे. एक सभागृह हे कमळाची संकल्पनेवर भित्तीचित्र तर दुसऱ्या सभागृहात मोराच्या संकल्पनेवरील चित्र आणि प्रतिमा असतील. नव्या इमारतीत सेन्ट्रल हॉल नसेल पण खासदारांच्या सामाजिक उपक्रमांसाठी सेन्ट्रल लॉन्ज उपलब्ध असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नव्या संसद भवनाची इमारत ही सेन्ट्रल विस्टा प्रकल्पाचा भाग आहे. एनडीए सरकारने ही प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर या योजनेनुसार, विविध विभागांच्या नव्या इमारती, सरकारी कार्यालये तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी नव्या निवासस्थानाची उभारणी देखील करण्यात येणार आहे. सध्याच्या संसद भवनात सभागृहांचा विस्तार करण्यास पुरेशी जागा उपलब्ध नाही. या नव्या सेन्ट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी २०,००० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी ८६१ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सन २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. तर नव्या संसद भवनाची इमारत ही २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. या नव्या संसद भवनात सर्व मंत्र्यांसाठी एकूण ९० कार्यालये असतील. यामध्ये खासदार आणि इतर व्हीव्हीआयपी लोकांना जेवणासाठी अनेक डायनिंग हॉल असतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नव्या संसद भवनाच्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होण्यापूर्वी जुन्या भनवामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.