रामवाडी भुयारी मार्गातील काम पूर्ण करावे; नगरसेवक मुळीक यांच्या ‘मेट्रो’ला सूचना

विश्रांतवाडी –कल्याणीनगर ते रामवाडी दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्याने रामवाडी भुयारी मार्ग बंद आहे. मेट्रोने भुयारी मार्गातील काम तत्काळ पूर्ण करावे. तसेच, मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, अशी सूचना मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्याचे तसेच 15 मार्चपर्यंत भुयारी मार्ग मेट्रोचे काम पूर्ण होईल, असे नगरसेवक योगेश मुळीक यांनी सांगितले.
कल्याणीनगर ते रामवाडी दरम्यान मेट्रोच्या कामांची पाहणी स्थानिक नागरिक व मेट्रोचे अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी मुळीक बोलत होते. यावेळी नगरसेविका शितल शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, संतोष राजगुरू, संतोष घोलप, मेट्रोचे अधिकारी अमोल मोहोळकर, आर. साईप्रकाश नायर, विजयसिंह आणि कल्याणीनगर वडगाव शेरीतील नागरिक उपस्थित होते.
मुळीक यांनी सांगितले की, रामवाडी भुयारी मार्गातील मेट्रोच्या कामाला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे कामाची गती कमी झाल्याचे मेट्रोचे अधिकारी सांगतात. या कामामुळे कल्याणीनगर वडगावशेरीतील नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणीवर तोडगा काढून लवकरात लवकर काम करणे गरजेचे आहे. या विषयावर मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी पाहणी दौऱ्यात चर्चा झाली, असे नगरसेवक मुळीक यांनी सांगितले.





