पुणे जिल्ह्यात अडीच हजार मजुरांच्या हाताला काम

पुणे – ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा पोहोचू लागल्या असून, रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) जिल्ह्यात 2 हजार 549 मजुरांच्या हाताला काम देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या ग्रामपंचायत आणि इतर विविध शासकीय यंत्रणेमार्फत कामे सुरू आहेत. या मजुरांना दररोज 206 रुपये रोजगार देण्यात येत आहे. ही रक्‍कम दर आठवड्याला संबंधित मजुरांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येते. रोहयोअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी 388 कामे सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते तयार करणे आणि विहिरी खोदण्याची कामे जास्त आहेत.

जलसंधारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात सिमेंट बंधारे, माती बंधारे, कंपार्टमेंट बंडिंग, बंधारे, शेततळे, सलग समतल चर यासारखी कामे करण्यात येत आहेत. तसेच जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गतही रोजगार दिले जात आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास जिल्हा प्रशासनामार्फत तत्काळ मंजुरी देण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुष्काळ निवारण समन्वय कक्ष
नागरिकांकडून दुष्काळाविषयी काही तक्रार प्राप्त झाल्यास या तक्रारींची नोंद घेण्यासाठी तसेच त्यांना योग्य ती माहिती देण्यासाठी दुष्काळ निवारण समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी यांना दुष्काळ नियंत्रण समन्वय अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी 020-26122114 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×