प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -पुणे आणि पिंपरी-चिंचवड येत्या नोव्हेंबरपासून मेट्रोने जोडली जाणार आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय आणि वनाज ते न्यायालयापर्यंतचा 25 किलोमीटरचा टप्पा ऑक्टोबरअखेर पूर्ण होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.
महामेट्रोकडून 6 मार्च रोजी वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी गरवारे महाविद्यालय ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मार्गावर मेट्रोची “ट्रायल रन’ घेण्यात आली असून, पुढील टप्प्यात दापोडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि डेक्कन ते न्यायालयापर्यंत नोव्हेंबरअखेर सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मेट्रोचा वनाज ते थेट पिंपरी-चिंचवडपर्यंतचा मार्ग सुरू होणार असून, दोन्ही शहरातील नागरिकांना नवीन सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
शिवाजीनगर येथे इलिव्हेटेड आणि भूमिगत या दोन्ही मेट्रो एकत्र येत आहेत. तसेच वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हे दोन्ही मार्ग एकत्र येत असल्याने या स्थानकाला जंक्शनचा दर्जा असणार आहे. या दोन्ही मार्गावरील शिवाजीनगर, आणि स्वारगेट या अंडरग्राऊड स्थानकाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.