“त्यांच्या निःस्वार्थ कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे”; राणी मुखर्जीकडून पोलिसांचे कौतुक

Rani Mukherjee : अभिनेत्री राणी मुखर्जीने मर्दानी सिनेमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक काळापासून अलिप्त असलेल्या राणीने या सिनेमातून जोरदार कमबॅक केले. हा सिनेमा तिच्या फिल्मी करिअरला कलाटणी देणारा ठरला. शिवानी शिवाजी रॅाय या पोलीस व्यक्तिरेखेने पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवली.
या सिनेमाचा पुढचा भाग मर्दानी २ हाही बॅाक्स अॅाफिसवर चांगला चालला. आता या सिनेमाचा पुढचा भाग म्हणजेच मर्दानी ३ ची घोषणा करण्यात आली असून, या सिनेमातून पुन्हा एकदा राणी शिवानी शिवाजी रॅायच्या भूमिकेत परतणार आहे. सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पोस्टरही शेअर केले आहे.
या सिनेमाविषयी बोलताना राणीने, “मर्दानी सारख्या सिनेमा फ्रँचायझीद्वारे मी भारतीय पोलिस दलाला सलाम करू शकले हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.” असे म्हटले आहे. देशभरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम आणि समर्पणाला आदरांजली वाहण्यासाठी मी प्रत्येक संधीची वाट पाहत आहे, असेही ती म्हणाली.
आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोलिस लोकांचे रक्षण करण्यासाठी दिवसरात्र काम करतात, त्यांच्या कुटुंबापासून दूर राहतात आणि त्यांचे जीवन धोक्यात घालतात. त्यांच्या निःस्वार्थ कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.” असे म्हणत तिने पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. २१ अॅाक्टोबर हा दिवस भारतीय पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याला पोलीस स्मृतिदिन किंवा पोलीस हुतात्मा दिन असेही म्हणतात. या दिनाचे औचित्य साधत राणी मुखर्जीने हे विधान केले आहे.
ती पुढे म्हणाली, “भारतीय पोलीस दिनानिमित्त, मी भारतीय पोलीस दलाला त्यांच्या अदम्य धैर्य, अढळ समर्पण आणि निस्वार्थ सेवेसाठी मनापासून सलाम करते. ते प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी उभे राहतात. आपण कधीही हे विसरू नये की गणवेशामागे एक माणूस आहे जो चांगुलपणाचा मार्ग निवडतो, सेवेला आपला धर्म मानतो आणि देशाला इतर सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ मानतो. आदित्य चोप्रा निर्मित आणि अभिराज मिनावाला दिग्दर्शित मर्दानी 3 हा सिनेमा 27 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : पाटण तालुक्यातील काठीटेकसह ११ गावांची बॉक्साईट आरक्षणातून सुटका – शंभूराज देसाई





