Women Toilets Pune – स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी अशा ओळखीने देशभरात नावलौकिक मिळविणाऱ्या पुण्यात गेल्या १५ वर्षांत महिलांसाठी नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहच बांधले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सहज उपलब्ध सार्वजनिक स्वच्छतागृह ही चैनीची नव्हे तर मूलभूत गरज आहे. मात्र, शहराच्या विकासाच्या गप्पांमध्ये हा प्रश्न सातत्याने मागे पडत असल्याचे या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. नगरसेविका अर्चना अमित जगताप यांनी मे महिन्याच्या मुख्यसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता शहराच्या प्रथम नागरिक महिला असताना तसेच महापालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला नगरसेविकांची संख्या अधिक असताना तरी प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने पाहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. पुणे महापालिका काय म्हणते प्रशासन प्रशासनाच्या उत्तरानुसार शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिलांसाठी ९३ सार्वजनिक शौचालये आणि २२ युरिनल्स उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी नऊ शौचालये दुरुस्तीअभावी बंद आहेत. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भागातच शौचालयांची ही अवस्था असल्याने महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. औंध-बाणेर भागात महिलांसाठी केवळ सहा सार्वजनिक शौचालये उपलब्ध आहेत. हडपसर-मांजरी भागात तर एकच स्वतंत्र महिला शौचालय असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. कोंढवा-उंड्री भागात १० सार्वजनिक शौचालये आणि सहा युरिनल्स आहेत, तर वानवडी भागात २६ सार्वजनिक शौचालये व दोन युरिनल्स उपलब्ध आहेत. बिबवेवाडी, कसबा पेठ आणि विश्रामबागवाडा भागातही महिलांसाठीच्या सुविधा अत्यंत मर्यादित असल्याचे उत्तरात नमूद केले आहे. राईट टू पी धोरणाचाही विसर ‘राईट टू पी’ धोरणाची अंमलबजावणीही शहरात प्रभावीपणे होत नसल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहे महिला व बालकांसाठी विनामूल्य खुली असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ग्राहक नसल्यास प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.