Shirur : शिरूरमध्ये ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकलेल्या ‘त्या’ महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागावर नागरिकांचा संताप
Shirur : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईला सामोरे गेलेल्या एका महिला तलाठीवर पुन्हा एकदा पुणे येथे लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Shirur : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईला सामोरे गेलेल्या एका महिला तलाठीवर पुन्हा एकदा पुणे येथे लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
वारंवार एकाच अधिकाऱ्यावर लाचखोरीचे आरोप होत असल्याने महसूल विभागातील पारदर्शकता, देखरेख आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर तलाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे व एका कोतवालाविरुद्ध दोन कोटी रुपयांच्या दंडाची भीती दाखवून १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून महसूल विभागात या कारवाईची जोरदार चर्चा आहे.
विशेष म्हणजे, संबंधित महिला तलाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे कार्यरत असताना त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.
या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा लाचखोरीचा गुन्हा नोंदवल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत नियंत्रण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा असून, यापूर्वी गुन्हा दाखल असतानाही त्यांची संवेदनशील पदांवर नियुक्ती कशी झाली, अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर विभागीय स्तरावर कोणती देखरेख ठेवली जाते, अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामांशी संबंधित महत्त्वाचा विभाग आहे. अशा विभागात वारंवार लाचखोरीची प्रकरणे उघडकीस येत असतील, तर शासनाने कठोर विभागीय कारवाई, नियमित चौकशी आणि पारदर्शक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.





