महिला सरपंचाला मारहाण

दोघांवर विनयभंगासह ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

लोणावळा –
येथील पाटण ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाच्या घरी जाऊन सरपंच तसेच त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग करुन मारहाण केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत मारहाण करणाऱ्या दोघांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगासह ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर दिनकर तिकोने व बबन भवानजी तिकोने (दोन्ही रा. पाटण, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. 03 एप्रिल रोजी ही घटना घडली. पाटण बोरज ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच रुपाली मंगेश पटेकर (वय 28) यांनी यासंदर्भात फिर्याद नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला सरपंच रुपाली पटेकर या त्यांच्या घराच्या समोरील ओट्यावर भांडी घासत असताना आरोपी शंकर दिनकर तिकोने हा दारू पिऊन त्या ठिकाणी आला.

रुपाली पाटेकर यांचे कुटुंब हे मागासवर्गीय समाजाचे आहे हे माहीत असताना देखील आरोपीने जातिवाचक व अश्‍लील शिवीगाळ करून तुमचे संपूर्ण खानदान नष्ट करतो अशी धमकी दिली. तसेच हाताने फिर्यादीच्या डोक्‍यात व पाठीवर मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी त्याठिकाणी आलेल्या फिर्यादी रुपाली पटेकर यांचे सासरे मारुती पटेकर व सासू इंदूबाई पटेकर यांना देखील हाताने मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. याचवेळी दुसरा आरोपी बबन भवानजी तिकोने याने त्याचे हातातील काठीने फिर्यादीचे पाठीत मारहाण करून फिर्यादीशी झटापट करून फिर्यादीचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शंकर दिनकर तिकोने व बबन भवानजी तिकोने (दोन्ही रा. पाटण, ता. मावळ) या दोघांच्या विरोधात भा.द.वि.क. 324, 323, 354, 504, 506, 34 अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)(11) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी.शिवथरे हे या घटनेचा पुढील तपास करीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.