Satara | स्त्रियांनी स्वतःच्या क्षमता ओळखणे गरजेचे

सातारा, (प्रतिनिधी)– स्त्रियांनी नवी क्षितिजे शोधणे, स्वतःच्या क्षमता ओळखणे आणि तिने जगामध्ये आत्मविश्वासाने वावरल्याशिवाय तिच्या प्रगतीमधील अडथळे दूर होणार नाहीत, असे मत ज्येष्ठ स्त्री वादी लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्यावतीने डॉ. शंतनू अभ्यंकर साहित्यनगरीत (हॉटेल निवांत) आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय साहित्य संमेलनाचे उदघाटन झाल्यानंतरच्या बीजभाषणात डॉ. धोंगडे बोलत होत्या.
यावेळी लेखक शरद तांदळे, शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर, मराठी साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे डॉ. संदीप श्रोत्री व श्रीराम नानल उपस्थित होते. डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, समाजामध्ये स्त्री वादाबद्दल गैरसमज आहेत. ही स्त्री विरुद्ध पुरुष अशी लढाई नाही. स्त्रीवादासाठी काम करणाऱ्या म्हणजे भांडकुदळ, एकट्या राहणाऱ्या, कुटुंब फोडणाऱ्या बायका असा गैरसमज आहे. मात्र, तसे नसून ती एक विचारधारा आहे, एक इझम आहे. त्याबाबत निरपेक्ष नजरेने अभ्यास केला पाहिजे. पूर्वग्रह मनात न ठेवता ही विषय समजून घ्यायला हवा. भारतीय किवा पाश्चात्य देशात पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला आजही दुय्यम मानले जाते. स्त्री वाद विचारात दुय्यमत्व नाकारणे महत्त्वाचे आहे. स्त्री पुरुष समान आहेत. स्त्री पुरुषांचा एकत्रित विकास हा वाद आहे. स्त्री पुरुषांमध्ये समता आहे. पण समानता नाही. बाई जन्माला येत नाही. ती घडवली, बनवली जाते. बायकांना बायकांसारखं वाढवलं जावं असा सापळा असतो. तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असायला हवं.
पुरुषामुळे तिला मोठेपण नको. तिचा अनादर नको. माणूस म्हणून जगण्याचा तिचा झगडा स्वतःचा स्वतःशी आहे. भारतीय स्त्रीला कोणतीही गोष्ट करताना नकार देता येत नाही. बायका सोशिकपणे ती गोष्ट करतात. नाही करणार हे सांगण्याचे धैर्य हवे. भारतीय स्त्री सोशिक आहे. कोणतेही काम ती करत असली तरी तिला कुटुंब महत्त्वाचे ठरते. ती परावलंबी असते, हळवी असते, रडकी असते असे चित्र मात्र आता बदलायला लागले आहे. ती सामर्थ्यवान होत आहे. आपल्या आकाशावर होणारे आक्रमण बाजूला सारुन आपलं अर्धं आकाश खुले करणे म्हणजे स्त्री वाद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.उदघाटनानंतरच्या सत्रात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळा, पुढे काय?या विषयावर झालेल्या परिसंवादात रेणू दांडेकर, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस व दै. प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी सहभाग घेतला. मराठीला हा अभिजात दर्जा आपोआप मिळाला नाही, त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाची माहिती देऊन विनोद कुलकर्णी यांनी मराठीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मिळाणाऱ्या निधीसाठी आता संघर्ष करणे आवश्यक बनणार आहे असे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांनी समन्वयाने काम करमे गरजे आहे, असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले. मराठीच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची गरज श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केली. निसर्ग आणि माणसं वाचता आली पाहिजेत, असे रेणू दांडकेर यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात लेखक शरद तांदळे यांची मुलाखत पद्माकर पाठकजी आणि शुभदा जगताप यांनी घेतली. नंतरच्या सत्रात कवी संमेलन, साहित्यिकांचे मनोगत झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठी काव्यसरितेतील नवदुर्गा हा आगळा कार्यक्रम झाला. या निमित्ताने छोटेखानी पुस्तक प्रदर्शनही झाले. डॉ. संदीप श्रोत्री यांनी समूहाची तसेच या उपक्रमाची माहिती दिली. श्रीराम नानल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अदिती काळमेख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. परिक्षिता भोसले व रागिणी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.





