महिलांनी अन्यायाचा सामना करण्याची शक्ती बाळगायला हवी – ऋतुजा जाधव

पुणे – महिलांनी आपल्या अधिकाराची माहिती घेतली पाहिजे. कायद्याचा दुरुपयोग न करता चांगला उपयोग करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचा सामना करण्याची शक्ती महिलांनी सतत बाळगायला हवी आहे, असे मत खडक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी व्यक्त केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाअंतर्गत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर विद्यार्थीनींसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर, पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रातील प्रा. डॉ. स्नेहा गोळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे, आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ.रुपेश थोपटे, कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. मंजुळा खोपडे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचा ८० वा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला.
तरुणाईमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत चालले असून त्यामुळे कुटुंबेच नष्ट होत आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यसनापासून दूर राहण्याचाच प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे, असा सल्लाही ऋतुजा जाधव यांनी दिला. महिलांनी अधिकाधिक ज्ञान आत्मसात करुन शिक्षण घेऊन सबलीकरण व सक्षमीकरणाकडे वाटचाल करायला पाहिजे, असे मत प्रा. डॉ. स्नेहा गोळे यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.रुपेश थोपटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रेयसी परब यांनी केले. आभार प्रा.शिवाजी मोटेगावकर यांनी मानले.





