Nevasa News : सुरेशनगर येथे बचतगटांच्या महिलांनी केली परसबागेची निर्मिती
नेवासा : महिला बचत गटांसाठी शासनाकडून विविध योजनांद्वारे मदत सुरू असताना, सध्या परसबाग तयार करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. याच धरतीवर नेवासा तालुक्यातील आदर्श गाव सुरेशनगर येथे महिला बचत गटांना एकत्रित येत परसबाग निर्माण केली आहे.
यावेळी बचत गटाचे संघटक विलास राठोड आणि दीपक दरोडे यांनी सुरेशनगर येथे भेट देऊन महिलांना परसबागेची संकल्पना सुचविली. भानसहिवरा प्रभागातील सीआरपी शाहिस्ता ताई,मनिषा शेरकर,ग्रामसंघाच्या अध्यक्षा माजी सरपंच सौ.अनिताताई पांडुरंग उभेदळ, सचिव दुर्गाताई पटारे,अलका उभेदळ,कृषी सखी कावेरी पठाडे, हंडिनिमगावच्या ग्रामसंघ लिपिका अश्विनी गडकर तसेच सर्व गटातील महिला यावेळी उपस्थित होत्या.
विलास राठोड व दीपक दरोडे यांनी परसबागेविषयी उपस्थित महिलांना माहिती दिली.परसबागेत पालेभाज्या, फळभाज्या आणि वेलवर्गीय बियाणांची लागवड कशी करायची हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगण्यात आले आणि परसबागेचे फायदे ही सांगण्यात आले.
आदर्शगाव सुरेशनगर येथे ९ महिला बचत गट असून, यात अंबिका महिला बचत गट व कानिफनाथ महिला बचत गट यास प्रत्येकी ६ लाख ५० हजार रुपये, तसेच लक्ष्मी माता महिला बचत गट व त्रिमूर्ती महिला बचत गट प्रत्येकी ३ लाख रुपये तसेच अन्य बचतगटांचे मिळून १९ लाख रुपये कर्ज वितरीत करण्यात आले.
त्याचप्रमाणे नवीन बचत गटाला प्रत्येकी ३० हजार रुपये खेळते भांडवल म्हणून देण्यात आले आहे. गावातील महिलांना चुल आणि चुल याच्याशिवाय माहिती नव्हती,परंतू आता महिलांना बँक आणि व्यवहार समजायला लागले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी फार मोठी मदत होणार आहे असल्याचे ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ अनिताताई पांडुरंग उभेदळ यांनी यावेळी बोलतांना सांगितले.





