पिंपरी – स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला आहे. गेल्या आठ वर्षांत नोंद झालेल्या गुन्ह्यांचा मागोवा घेतल्यास रोज महिलांना या बीभत्स त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येते. पिंपरी-चिंचवड शहरात महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम, स्वसंरक्षणाचे वर्ग आणि जनजागृती मोहिमा वारंवार राबविल्या जात असल्या तरी महिलांची प्रत्यक्षात सुरक्षा कितपत सुनिश्चित झाली आहे, हा प्रश्न कायम आहे. पोलीस नोंदींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शहरातील महिलांची असुरक्षा अधोरेखित होते. गेल्या आठ वर्षांत १६७४ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत; तर विनयभंगाच्या तब्बल ३०७८ तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. म्हणजेच शहरात जवळजवळ दररोज महिलांविरोधात अत्याचार किंवा छेडछाडीची घटना समोर येत आहे. या नोंद झालेल्या घटना आहेत. मात्र नोंद न झालेल्या घटना याहून अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औद्योगिक भाग, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था आणि कामासाठी मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची वर्दळ सतत वाढत आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या, शिक्षण किंवा नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, वाहतूक व्यवस्था, अंधारे रस्ते, निर्जन ठिकाणी सुरक्षा यंत्रणेचा अभाव, पोलिसांची अपुरी गस्त, तसेच काही भागातील गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे असुरक्षिततेची भावना अधिक वाढताना दिसत आहे. अनेक महिलांनी अनौपचारिकरित्या व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांनुसार, काहीवेळा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यानंतरही पथक घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो, अशी तक्रार ऐकू येते. शहरातील बसथांबे, उद्याने, पुलाखालील परिसर, आणि काही झोपडपट्टीतील रस्ते येथे रात्री पथदिवे बंद असणे किंवा पोलीस गस्त अपुरी असणे ही देखील मोठी समस्या असल्याचे दिसते. छेडछाड, विनयभंग, पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे यांसारख्या प्रकारांना महिलांना वारंवार सामोरे जावे लागत असल्याची कबुली अनेकांनी दिली. काही भागात भिकारी, गर्दुल्ले आणि उनाड तरुणांच्या अड्ड्यांमुळेही महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. महिला सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करणे, निर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, अंधारे रस्ते प्रकाशमान करणे, रात्री गस्त वाढविणे आणि तक्रारींवर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे. दामिनी पथकही नावालाच शाळा कॉलेजमधील मुली, बाजारात जाणाऱ्या महिला यांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहे. मात्र या पथकाने आत्तापर्यंत एकही लक्षणीय कामगिरी केलेली दिसत नाही. तसेच शाळा कॉलेजमधील पोलीस काका आणि पोलीस दीदी हा उपक्रमही जवळपास गुंडाळल्यात जमा आहे. तडीपाराने शहरात राहून केला अत्याचार पिंपरी चिंचवड शहरातून फारूख सत्तार शेख (वय २५, सध्या रा. चिंबळी फाटा, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) याला परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त यांनी ८ एप्रिल २०२४ रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करीत तो गेल्या दोन महिन्यांपासून चिंबळी फाटा परिसरात राहात होता. या कालावधीत तडीपार आरोपी फारूख शेख याने एका ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. जर तडीपार केलेले गुंड शहरात येऊन लैंगिक अत्यारात करीत असतील तर खरच हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा सवाल नागरिक करीत आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भागवत शेप यांनी तडीपार गुंडावर लक्ष ठेवले नाही म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.