प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – बाबुर्डी येथे शारदा महिला संघाच्या समृद्ध महिला अभियान अंतर्गत महिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी शारदा महिला संघाच्या संस्थापक सुनंदा पवार यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबाबत सखोल मार्गदर्शन केले.पवार म्हणाल्या, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही उद्योजकता, आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या चार घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड या चार तालुक्यांतील सुमारे 17 हजार महिला शारदा महिला संघाशी जोडल्या गेल्या आहेत. यामधून महिलांना विविध व्यवसाय व प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवले जात आहे. कृषी प्रदर्शन, भीमथडी यात्रा, धान्य महोत्सव अशा विविध माध्यमांतून त्यांना व्यवसाय सादरीकरणाची संधीही दिली जात आहे. सुनंदा पवार म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी आर्थिक शिस्त जोपासली आहे. ही पत कायम ठेवली पाहिजे. पतसंस्था व बँका विश्वासाने कर्ज देतात, जर त्यांचा ट्रॅक चांगला असेल. यासाठी महिलांनी आपले कलागुण ओळखून त्यानुसार उद्योग सुरू करावा आणि मन लावून काम केल्यास नक्कीच यशस्वी होता येते.यावेळी आदित्य बिर्ला ट्रस्टच्या पूजा गुंजाळ यांनी महिलांना आरोग्यविषयक टिप्स दिल्या. ग्रामपंचायत सदस्या रूपाली लडकत यांनी महिलांच्या भूमिका यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नगरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन लडकत, प्रकाश साळुंखे, गजानन मोकाशी, सीमा पानसरे, अभिषेक जगताप, राहुल चव्हाण, तात्या शेलार यांनी केले. सूत्रसंचालनही त्यांनी सामूहिकरीत्या केले. “आजकाल अनेक महिला मोबाईलमध्ये जास्त गुंततात. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कुटुंब महत्त्वाचे आहे. त्याच्या प्रगतीसाठी वेळ, कौशल्य आणि प्रेम द्या. मुलांवर चांगले संस्कार दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम कुटुंबावर आणि समाजावर होतात. हे युग स्पर्धेचे आहे. यात टिकून राहायचे असेल, तर महिलांनी नव्या संधी शोधल्या पाहिजेत. उद्योग निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवले पाहिजे.” -सुनंदा पवार, सुनंदा पवार, संस्थापक शारदा महिला संघ