पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मंगळसूत्र असे दीड लाख रुपयांचा ऐवज दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना पोलीस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दळवीनगर येथे सोमवारी (दि. 24) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.
शैला गोविंद उत्तेकर (वय 57, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 24) याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तेकर या सोमवारी रात्री नऊ वाजता चिंचवडमधील दळवीनगर चौकाजवळ रस्त्याने पायी चालत जात होत्या. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅमचे सोन्याचे गंठण आणि 15 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण दीड लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले.
प्रेमलोकपार्क, चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय आहे. यामुळे या परिसरात रात्रंदिवस पोलिसांचा राबता असतो. पोलीस आयुक्तालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दळवीनगर चौकात महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.