Pune District : लग्न जमवण्याच्या व्यवहारातून महिलेवर जीवघेणा हल्ला
Pune District : ही बाब पोलिसांना कळविण्यासाठी ओंकार चव्हाण पोलीस ठाण्याकडे गेले असताना, धनराज कदम यांनी जवळील कात्रीने वैष्णवी ओंकार चव्हाण यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे.

आळंदी :लग्न जमवून देण्याच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादातून एका महिलेवर कात्रीने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना आळंदी येथे घडली. या हल्ल्यात वैष्णवी ओंकार चव्हाण या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या मानेवर पाच टाके पडले आहेत.
ओंकार रमेश चव्हाण आणि त्यांची आई रुक्मिणी रमेश चव्हाण (रा. इंद्रायणीनगर, आळंदी) हे गेल्या काही वर्षांपासून लग्न जमवून देण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून ठरलेली रक्कम स्वीकारली जाते. सन 2021 मध्ये रुक्मिणी चव्हाण यांनी धनराज दशरथ कदम आणि मीनाक्षी धनराज कदम यांचा विवाह जुळवून दिला होता. मात्र, लग्नानंतर काही काळात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाल्यानंतर धनराज कदम यांनी विवाहासाठी दिलेली एक लाख रुपयांची रक्कम परत मिळावी, अशी मागणी ओंकार चव्हाण यांच्याकडे वारंवार करण्यास सुरुवात केली. याबाबत धनराज कदम सातत्याने फोनवरून त्रास देत असल्याने ओंकार चव्हाण यांचे मेव्हणे अभिषेक आंबीरकर यांनी पोलिसांकडे ऑनलाइन तक्रारही दाखल केली होती.
यानंतर दोन्ही कुटुंबीय आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार मिटविण्यासाठी आले होते. पोलिसांनी आर्थिक व्यवहार आपापसात मिटविण्याचा सल्ला दिल्यानंतर दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर चर्चा करण्यासाठी गेले. चर्चेदरम्यान चव्हाण कुटुंबीयांनी धनराज कदम यांचे पैसे परत देण्यास सहमती दर्शविली. मात्र, धनराज कदम यांनी तत्काळ पैसे देण्याचा आग्रह धरला. यावेळी धनराज कदम यांची पत्नी मीनाक्षी कदम यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असता, धनराज कदम यांनी त्यांनाच मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. ही बाब पोलिसांना कळविण्यासाठी ओंकार चव्हाण पोलीस ठाण्याकडे गेले असताना, धनराज कदम यांनी जवळील कात्रीने वैष्णवी ओंकार चव्हाण यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे.
वैष्णवी चव्हाण यांच्या आरडाओरडीनंतर त्यांचे पती ओंकार चव्हाण आणि बंधू अभिषेक आंबीरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांची सुटका केली. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवी चव्हाण यांना तत्काळ आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या मानेवर पाच टाके घालावे लागल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.





