Pune Crime : चरस, गांजा विकणारी महिला पोलिसांच्या ‘जाळ्यात’; 21kg गांजा ‘जप्त’

पुणे – कोंढवा भागात गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तिच्याकडून 21 किलो गांजा, चरस तसेच मोबाइल संच असा सहा लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
समीना मेहमुद शेख (35 , रा. नझारा मंजील, भागोदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. शेख घरातून अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस नाईक मनोज साळुंके यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तेथे पाळत ठेवली होती.
त्यानंतर पोलिसांनी शेखच्या घरावर कारवाई करून तेथून 21 किलो गांजा, 569 रॅम चरस, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, मारूती पारधी, विशाल दळवी, रेहाना शेख आदींनी ही कारवाई केली.





