Saswad : पुरंदर तालुक्यात भररस्त्यात महिलेची हत्या
Saswad : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शशिकांत माणिकराव काकडे आणि सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून ४७ वर्षीय महिलेची लोखंडी रॉड आणि विटेने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास घडली. उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे, ता. पुरंदर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे भाऊ गणेश दत्तात्रय मेमाणे (वय ३९, रा. श्रीलक्ष्मी एन्क्लेव्ह सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शशिकांत माणिकराव काकडे आणि सुलोचना माणिकराव काकडे (दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, उज्वला काकडे यांचे दीर शशिकांत काकडे यांनी त्यांच्याकडे पती रामदास माणिकराव काकडे यांनी घेतलेल्या पैशांची परतफेड, चेक, सोन्याचे दागिने तसेच इतर कागदपत्रांची मागणी केली होती. याच कारणावरून वाद झाल्याचा आरोप आहे. या वादातून शशिकांत काकडे यांनी उज्वला यांच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि विटेने मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच सासू सुलोचना काकडे यांनी शशिकांत यांना पाठबळ दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पांगारे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक तथा सासवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





