मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहीसरमध्ये विवाहबाह्य संबंधांतून २८ वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह घरातील किचनमध्येच पुरला. रईस शेख असे मृत पतीचे नाव आहे. रशीदा शेख असे आरोपी पत्नीचे नाव असून अमित मिश्रा तिच्या प्रियकराचे नाव आहे. या घटनेनंतर अमित फरार आहे. या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, रशीदा शेख व तिचा प्रियकर अमित मिश्रा या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. दरम्यान या दोघांनी पती रईस शेखचा धारदार शस्त्राच्या सहाय्याने मुलांसमोरच गळा चिरुन खून केला. हत्या केल्यानंतर किचनमध्ये मृतदेह पुरला व नेहमीसारखं जगणं सुरु केलं. रईस येथील एका कापड दुकानात कामाला होता. बऱ्हाच दिवसांनंतर तो गायब असल्याकारणाने २५ मे रोजी रईसच्या शेजाऱ्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. दरम्यान रईसचा भाऊ त्याच्या घरी आला. त्यावेळी पुतण्यांनी काकाला घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनंतर हा भयंकर गुन्हा उघडकीस आला. पुढील तपास पोलिस करत आहेत.