पुणे जिल्हा | बिबट्यांच्या हल्ल्यात महिला ठार

ओतूर, (वार्ताहर) – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर असणारे पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत गाजर पट शिवारात उन्हाळी बाजरी पिकाची राखण करत असताना दोन बिबट्यांनी एका महिलेवर हल्ला करून तिला उसाच्या शेतात ओढून नेऊन पुन्हा हल्ला चढविल्याने त्यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ओतूर वनविभाग परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. दरम्यान, ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी सव्वाआठच्या सुमारस घडली.
नानाबाई सिताराम कडाळे (वय 45, रा. चास, पिंपळदरी ता. अकोले, जि. अहमदनगर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कडाळे या कुटुंबाचा उदरनिर्वासाठी पिंपरी पेंढार येथील तुषार पडवळ या शेतकर्याकडे सरकती म्हणून शेती कामास होत्या.
उन्हाळी बाजरीचे पीक जोमात आले असता पाखरांपासून बाजरीचे संरक्षण करण्यासाठी त्या सकाळी लवकर उठून शेतावर गेले असता शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर प्राणघातक हल्ला चढविला.
या घटनेची माहिती परिसरामध्ये पसरतात परिसरातील आजूबाजूच्या लोकांनी मोठी गर्दी जमा केली यावेळी जमावांनी वन विभागाला लक्ष करून पण विभागाच्या विरोधात नाराजी व आक्रोश केला. घडलेली घटना अतिशय वाईट आहे; मात्र वन विभाग अधिकारी व कर्मचारी त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत असून शेवटी आम्ही माणूसच आहे.
बिबट प्राणी असतो पोटाची खळगी भरण्यासाठी चुकून मानव प्राण्यावर हल्ले होतात प्रामुख्याने आपण ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या या परिसरामध्ये बिबट हल्ले वाढलेले आहेत. बिबटप्रवण क्षेत्रात लहान मुले व पाळीव प्राणी यांची काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले असल्याचे ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले.
…अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील
आता शेतकर्यांची सहनशीलता संपुष्टात आली आहे काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये आणि उंब्रज, काळवाडी, पिंपळवंडी या ठिकाणी बिबट्याचे सतत हल्ले होत असताना अनेक जणांनी या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमवावे लागले वन विभागाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळावी; अन्यथा शेतकरी वर्ग कायदा हातात घेतील, असा आजच्या जमावाने वनविभागाला इशारा दिला आहे.





