पुणे : येथील एका तरुणीने चंदगड येथील तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून काशी येथे नेले. तेथे त्याच्यावर शारीरिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याशिवाय २ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही, तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिल्याबाबत चंदगड येथील एका ४७ वर्षांच्या व्यक्तीने कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी कोथरूड येथील ४२ वर्षांच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ मार्च ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. फिर्यादीचे कुटुंब गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी तुळजापूर येथे दर्शनासाठी गेले असता पुण्यातील या महिलेची ओळख झाली. त्यातून महिलेने फिर्यादीच्या घरी जाणे सुरू केले. फिर्यादीच्या पत्नीला तिने मी फिर्यादीस भाऊ मानत असल्याचा दिखावा केला. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीला कॉल करून पुण्यातून माझी मैत्रीण स्वाती व तिचे कुटुंब आम्ही काशीला जाणार आहोत. तुझ्या पतीलाही पाठवून दे, असे सांगितले. काशी येथे नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख तपास करीत आहे.