Crime News : चांडोहमध्ये महिलेस शिवीगाळ करून मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर : चांडोह (ता. शिरूर) येथे किरकोळ वादातून महिलेस व तीच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह (ता.शिरूर जि. पुणे) येथील कुणाल गोडसे यांच्यासोबत शुक्रवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास आदीत्य पानमंद व ज्ञानेश्वर रोकडे यांचा किरकोळ वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून पानंमद आणि रोकडे यांनी गोडसे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यावेळी कुणालची आई रेश्मा गोडसे या भांडण सोडविण्यासाठी आल्या व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना व त्यांच्या सुनेला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी आदित्य पानंमद याने त्यांच्या हाताला चावा घेऊन दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. रेश्मा गोडसे (रा. चांडोह ता. शिरूर) यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करत आहेत.





