शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही

संजय राऊत: स्वपक्षाचा मुख्यमंत्री होणारच असल्याचा पुनरूच्चार
मुंबई: विधानसभा निवडणुकीत शंभरी गाठण्याचा विश्‍वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. तसेच, आमच्या पाठिंब्याशिवाय भाजप राज्यात सरकार स्थापन करू शकणार नाही, असा दावाही त्या पक्षाने केला आहे.

निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला बुधवारी एका वृत्त वाहिनीशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षाच्या चांगल्या कामगिरीबाबत विश्‍वास व्यक्त केला. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप, शिवसेना आणि इतर लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचे भाकीत केले आहे.

मात्र, एका चाचणीने भाजप एकट्याच्या बळावर बहुमताच्या आकड्याजवळ पोहचेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्याकडे लक्ष वेधल्यावर राऊत यांनी भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असे म्हटले.

शिवसेना 100 जागा जिंकेल. महायुती मिळूून 200 चा आकडा पार करेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, या पक्षाच्या निर्धाराचा पुनरूच्चार करत ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसा शब्द दिला आहे. त्यांच्या नेतृत्वावर आणि डावपेचांवर सर्व शिवसैनिकांचा विश्‍वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.