पुणे जिल्हा | परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी

इंदापूर, (प्रतिनिधी)– यंदाच्या खरीप हंगामातील जून ते सप्टेंबर महिन्याचा पावसाचा कालावधीत संपुष्टात आला आहे. या कालावधीत इंदापूर तालुक्यात बर्यापैकी अतिरिक्त पावसाची नोंद झाली. त्यानंतर पाऊस दिलासा देईल, अशी आशा होती. सध्या मका पिकाची मोडणी अनेक ठिकाणी शेतकर्यांनी चालू केलेली आहे.
याची मका कणसे शेतातच आहेत; मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होऊन पावसाच्या सरी येत असल्याने कापणी झालेला मका शेतकरी संकटात सापडला आहे.
याबाबत माहिती अशी की, परतीचा पाऊस शेतकर्यांच्या काही पिकांना वरदान ठरला तर, गरीब शेतकर्यांच्या दोन-तीन महिन्याचे घेतले जाणारे चार्याचे पीक, वाया जाण्यापर्यंत नुकसान करून गेला आहे. ज्या शेतकर्यांनी मका मोडली होती. त्या मक्याची कणसे पाण्याने बाद झाले आहे.
मका काळी पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांचे मका पीक नुकसान, दीपावली सणाच्या तोंडावर झाल्याने, मोठे आर्थिक संकट शेतकर्यांसमोर आले आहे. तसेच ज्यांनी दीपावली कालावधीत फुलांची शेती केली आहे. त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या चिंतेने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसत असल्याने, उभी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत प्रचंड मेहनत करून शेतकरी वर्गाने आपापली शेती चांगली सांभाळून ठेवली. आत्तापर्यंत पिकेही जोमदार आली असतानाच परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने शेती क्षेत्रावर मोठे संकटच कोसळले आहे.
काही ठिकाणी उभी चारापिके, तरकारी, फळभाज्या अशी पिके या पावसाने आडवी झाली आहेत. पावसामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुढील काही दिवसांवर येऊन ठेपलेला दिवाळी सणाचा विचार केला असता आणि पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर वर्गाची दिवाळी, अंधारात जाणार असल्याची भीतीही शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे शेतकर्याकडे दुर्लक्ष
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे, प्रत्येक राजकीय लोकप्रतिनिधी गोळा बेरीज करण्यासाठी मोठी धडपड करत आहेत. त्यामुळे ज्या शेतकर्यांचे पावसामुळे नुकसान झाले. त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ दिसत नाही. किंवा प्रशासनाला देखील याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.





