छिंदवाडा – लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील कॉंग्रेसची टीम मात्र राजकीय विश्रांतीवर असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील कॉंग्रेस नेत्यांनी ब्रेक घेतल्याचे म्हटले जाते आहे. त्याचे कारण अन्य पक्षांची आणि स्वत: कॉंग्रेसची जोरदार निवडणूक तयारी सुरू असताना कॉंग्रेसचे येथील वरिष्ठ नेते जिल्ह्यातील इंदिरा गांधी स्टेडीयमवर क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत.
याबाबत चर्चा सुरू झाल्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निष्ठावान कॉंग्रेसचे राजकीय रणनीतीकार आशीष त्रिपाठी यांनी याचा इन्कार केला आहे. आमचे लोकसभा निवडणुकीवर पूर्ण लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भारतीय जनता पार्टीचे छिंदवाडा मतदार संघावर लक्ष आहे. ते आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र छिंदवाडा ही कॉंग्रेसची भिंत आहे असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्रिपाठी ज्या भिंतीचा दावा करत आहेत ती आता खूप ठिसूळ झाली आहे. कारण विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या पराभवानंतर गेल्या काही आठवड्यातच मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे अनेक छोटे मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
नेमका आकडा सांगायचा झाला तर अशा नेत्यांची संख्या ४५०० च्या आसपास आहे. त्यात कमलनाथ यांच्या छिंदवाडातील १५०० जणांचाही समावेश आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महापौर, सरपंच अशा सगळ्यांनीच भाजपचा रस्ता धरला आहे. कदाचित कमलनाथ गेल्या पंधरवड्यात पक्षांतर करण्याच्या प्रयत्नांत होते, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या स्थलांतरालाही वेग आला होता.
मात्र तूर्त कमलनाथ आणि त्यांचे पुत्र स्वगृही थांबले असले तरी ज्या प्रकारे कॉंग्रेसचे नेते क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत त्यावरून येथे वेगळेच काहीतरी शिजते आहे असे दिसते.
का थांबले कमलनाथ?
कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ भाजपमध्ये जाणारच अशी स्थिती निर्माण झाली होती. पिता-पुत्र दिल्लीलाही रवाना झाले होते. मात्र त्यांनी पक्षांतराचा बेत का रद्द केला हे गुलदस्त्यातच राहीले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेशातील पराभवानंतर कॉंग्रेसचे श्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होते. तरीही कमलनाथ यांची मुलाला लोकसभेवर आणि स्वत: राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती.
मात्र श्रेष्ठींनी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी मधल्या काळात चुळबुळ केली. हे जरी खरे असले तरी त्यांनी भाजप प्रवेश का रद्द केला हा प्रश्न राहतोच. बरे कॉंग्रेसची आजची स्थिती अशी आहे की ते कमलनाथ यांना काही कमिटही करू शकत नाहीत. त्यामुळे कमलनाथ चॅप्टर तेंव्हाही आणि आताही एक गूढ बनून राहीला आहे.