WinZO founders arrested: ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या WinZO प्लॅटफॉर्मचे संस्थापक पावन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगच्या गंभीर आरोपांखाली अटक केली आहे. बेंगळुरू येथे चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. रियल-मनी गेम्सवर (Real-Money Games) बंदी आल्यानंतर कंपनीने सुमारे ₹४३ कोटी रुपयांची रक्कम खेळाडूंना परत न करता ती आपल्याकडेच ठेवली, असा ईडीचा मुख्य आरोप आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन गेमिंग कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, WinZO ने नियमांचे उल्लंघन केले. बंदीनंतर वापरकर्त्यांचे पैसे नियमानुसार परत करणे बंधनकारक असताना, कंपनीने ते रोखून ठेवले. WinZO वर केवळ पैसे रोखण्याचाच नव्हे, तर फसवणुकीचाही आरोप आहे. प्लॅटफॉर्मवर खेळाडूंना खऱ्या माणसांविरुद्ध खेळायला लावले जात असल्याचे भासवत असताना, प्रत्यक्षात त्यांना अल्गोरिदम (Algorithm) सोबत लढण्यास भाग पाडले जात होते. वापरकर्त्यांना याची कोणतीही माहिती नव्हती. 505 कोटी रुपयांचे फंड फ्रीज – मागील आठवड्यात ईडीने WinZO आणि ‘गेम्सक्राफ्ट’ (Gameskraft) सह अन्य गेमिंग कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या तपासानंतर ईडीने WinZO कंपनीचे सुमारे ५०५ कोटी रुपये किंमतीचे बाँड्स, मुदत ठेवी (FD) आणि म्युच्युअल फंड गोठवले आहेत. परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली मोठा निधी अमेरिका आणि सिंगापूरला पाठवल्याचा संशयही ईडीने व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर WinZO कंपनीने आपली बाजू मांडली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचा प्लॅटफॉर्म पूर्ण पारदर्शकतेने आणि सर्व कायद्यांचे पालन करून काम करतो. वापरकर्त्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तथापि, खेळाडूंच्या वॉलेटमधून पैसे काढण्यावर निर्बंध घालून आणि अल्गोरिदमचा गैरवापर करून WinZO ने अवैध निधी गोळा केला, या ईडीच्या दाव्यावर तपास सुरू आहे. पावन नंदा (आयआयएम कोलकाता येथून एमबीए) आणि सौम्या सिंह राठौर यांनी २०१८ मध्ये WinZO गेम्सची स्थापना केली होती. २०२० मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला कंपनीचा ब्रँड अँबेसेडर बनवण्यात आले होते, तसेच शाहरुख खानच्या KKR टीमसोबतही स्पॉन्सरशिपचा करार करण्यात आला होता. मायक्रो-ट्रान्झॅक्शन (Micro-Transaction) आधारित असलेला हा प्लॅटफॉर्म सध्या ईडीच्या रडारवर आहे.