Winter Superfood : हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात विविध हिरव्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामध्ये कांद्याची पात ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार कांद्याची पात ही हिवाळ्यासाठी एक प्रभावी सुपरफूड आहे. हिवाळ्यात कांद्याची पात का उपयुक्त? थंडी वाढताच सर्दी, खोकला आणि संसर्गाचा धोका वाढतो. कांद्याच्या पातीत नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराला आजारांपासून संरक्षण देतात. तसेच तिचा उष्ण स्वभाव शरीराला आतून गरम ठेवण्यास मदत करतो. रोगप्रतिकारशक्ती आणि श्वसनासाठी फायदे कांद्याच्या पातीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कफ कमी होणे, फुफ्फुसे स्वच्छ राहणे आणि श्वसनमार्गातील सूज कमी होण्यासाठी कांद्याची पात उपयुक्त ठरते. हाडे आणि रक्तासाठी महत्त्वाची कांद्याची पात व्हिटॅमिन K चा चांगला स्रोत आहे. हे व्हिटॅमिन हाडे मजबूत ठेवते आणि हाडांची झीज रोखते. तसेच जखम झाल्यास रक्तस्राव नियंत्रित ठेवण्यासाठीही ते आवश्यक असते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर कांद्याच्या पातीत असलेले अॅलिसिन घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. पचनक्रियाही सुधारते. कांद्याची पात खाण्याची योग्य पद्धत तज्ज्ञांच्या मते कांद्याची पात फार जास्त शिजवू नये. ती कच्ची सलाडमध्ये, सूपवर किंवा भाजीमध्ये हलकी परतून वापरता येते. पात आणि दांडा दोन्ही भाग पौष्टिक असतात. हिवाळ्यात रोजच्या आहारात कांद्याची पात समाविष्ट केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.