तापमानातील बदलाने शहरात वाढली रुग्ण संख्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तापमानाचा पारा घटला आहे. शहरात कमाल 26 तर किमान 16 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 29 अंशावर होता. पारा घसरल्याने शहरामध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे.
पावसाळा संपूनही परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने थंडी लांबली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून शहरामध्ये थंडी जाणवू लागली. मात्र, मागील आठवड्यामध्ये तापमानात पुन्हा वाढ झाली होती. चार दिवसांपूर्वी शहरामध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडल्या. शहरातील तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसांपासून कमी होऊ लागल्याने सध्या हवेतील गारव्याने गुलाबी थंडीची अनुभूती येत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमानात काही अंशांची घसरण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला होता. परंतु कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाला. गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून, तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी घसरले आहे. वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी आदी आजारांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी हिवाळ्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आवश्यक आहेत.
हिवाळा सुरू झाला की, त्याचे संकेत सर्दी-खोकल्याच्या माध्यमातून मिळतात. सकाळपासूनच हवेत गारवा व पहाटे धुके येत असल्याने मानवाच्या शरीरावर परिणाम होतो. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस इतके आहे. आगामी आठवडाभर कमाल तापमानात एक ते दोन अंशाची घसरण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.