प्रभात वृत्तसेवा इंदापूर – हिवाळ्याची चाहूल लागताच इंदापूर शहर, निमगाव केतकी आणि भिगवण येथील आठवडे बाजारांसह दैनंदिन बाजारांमध्ये आंबट आणि तुरट चवीच्या रानमेव्याची आवक वाढली आहे. बोरे, आवळे आणि बोंडे अशा हंगामी रानफळांची आवक वाढताच शहरी ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. थंडी वाढताच ग्रामीण भागातील बोरझाडांवर रसरशीत बोरे लगडली आहेत. टपोऱ्या बोरांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. बोरांसोबतच ‘क’ जीवनसत्वाने समृद्ध आवळ्यांची मागणीही वाढली आहे. आवळे सध्या १०० ते १५० रुपये किलो दराने उपलब्ध असून, गृहिणी आवळ्याचा पेठा, लोणचे आणि च्यवनप्राश तयार करण्यासाठी खरेदी करत आहेत. सुरुवातीला तुरट आणि वाळल्यावर गोडव्यासाठी ओळखले जाणारी बोंडेही लोकप्रिय ठरत आहेत. तुळशी विवाहानंतर हे रानमेवे परिपक्व होऊन विक्रीला येतात.जाणकारांच्या मते ही फळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात. मात्र, वाढती वृक्षतोड, जंगलातील वनवे आणि अवैध कत्तलीमुळे या नैसर्गिक रानफळांच्या उपलब्धतेला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे. अनियंत्रित वृक्षतोड आणि अतिक्रमणामुळे बोरी व आवळ्याची झाडे कमी होत असून, शासनाबरोबरच नागरिकांनीही संवर्धनात हातभार लावला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रानमेव्याचा ठेवा जपा या रानमेव्या संदर्भात प्रतिक्रिया देताना आदर्श शेतकरी हेगडे मामा, रामकुंड म्हणाले, निसर्गाशी नाळ जोडणारी परंपरा नव्या पिढीने पुढे न्यावी. हिवाळ्यात मिळणारा रानमेवा हा आपल्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत पुरावा आहे. बोरे,आवळे, बोंडे ही फळे केवळ चविष्टच नाहीत, तर आमच्या बालपणापासूनच आरोग्याचा पाया घालणारी आहेत. आजच्या तरूण पिढीच्या आहारात या नैसर्गिक देणगीची कमतरता जाणवते. म्हणूनच ही रानफळे खाण्याची परंपरा पुन्हा जागवणे अत्यावश्यक आहे.थंडीच्या मोसमात बोरे किंवा आवळ्यातील जीवनसत्व ‘क’ हे नैसर्गिक औषध आहे. बाजारात आता रानमेव्याची चांगली उपलब्धता दिसते,ही सकारात्मक बाब आहे.मात्र वाढत्या वृक्षतोडीमुळे या फळांची संख्या कमी होत चालली आहे, ही चिंताजनक बाब आहे.