हिंगोलीत वादळी वाऱ्याने केळी बागांचे ३ कोटींचे नुकसान; शेतकरी हवालदिल

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : कळमनुरी तालुक्यात सोमवारी (९ जून २०२५) रात्री आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. डोंगरकडा, डिग्रस, रेडगाव, वडगाव, सालापूर, रामेश्वर, जवळा पांचाळ, गुंडलवाडी, भाटेगाव या भागातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, महसूल विभागाने तपासणी सुरू केली आहे.
या भागात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी आणि विहिरींच्या उपलब्धतेमुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. ही केळी चंदीगड, अमृतसर, दिल्ली येथे विक्रीसाठी जाते. मागील वर्षी जून-जुलैमध्ये लावलेली रोपे १२ महिन्यांच्या खत व्यवस्थापन आणि फवारणीनंतर काढणीसाठी तयार झाली होती. पुढील १५ दिवसांत घड काढणी होणार होती. मात्र, सोमवारी रात्री ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास अर्धा तास चाललेल्या वादळी वाऱ्याने ७० ते ८० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या. जमिनीवर पडलेले घड आता विक्रीयोग्य राहिले नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
डोंगरकडा परिसरात एका तासात वादळाने शेकडो हेक्टरवरील बागा उध्वस्त केल्या. आज (१० जून) सकाळी तोडणीला सुरुवात होणार होती, पण अवकाळी वादळाने शेतकरी राजू दत्तराव गावंडे यांच्यासह अनेकांचे स्वप्न भंगले. त्यांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते आणि तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना पाहणीचे आदेश दिले. पुढील दोन दिवसांत नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार होईल. शेतकऱ्यांनी शासनाकडून तात्काळ आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.





