इराणमध्ये सत्तापालटाचे वारे: निदर्शनांमुळे सरकार दबावाखाली, अर्थव्यवस्था कोलमडली

Iran Protest: इराणमधील इस्लामिक राजवटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांमुळे सध्याचे नेतृत्व प्रचंड दबावाखाली आले आहे. गेल्या अनेक वर्षांतील हे सर्वात मोठे आंदोलन मानले जात असून, देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि अंतर्गत असंतोषामुळे इराणच्या ४७ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात कठीण संकट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षी इस्रायलसोबत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धामुळे आणि अमेरिकेने अणुकेंद्रं लक्ष्य केल्यामुळे इराणचे लष्करी सामर्थ्य कमकुवत झाले आहे. ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी सध्या सार्वजनिक जीवनातून दूर आहेत, तर सुधारणावादी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याकडे परिस्थिती बदलण्यासाठी मर्यादित अधिकार उरले आहेत. खामेनी यांचा उत्तराधिकारी अद्याप ठरलेला नसल्याने राजकीय अनिश्चितता अधिकच वाढली आहे.
अमेरिकेने पुन्हा लादलेले निर्बंध आणि इराणचे चलन ‘रियाल’मध्ये झालेली ऐतिहासिक घसरण यामुळे जनता संतप्त आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने सामान्य व्यापाऱ्यांनीही आता रस्त्यावर उतरून निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असल्याने आणि चीनने केवळ स्थिरतेची अपेक्षा व्यक्त केल्याने इराण सध्या जागतिक राजकारणात एकाकी पडला आहे. तसेच, इस्रायलने मध्यपूर्वेतील इराणच्या समर्थक गटांना (हिजबुल्ला, हमास) कमकुवत केल्याने इराणचा प्रादेशिक दबदबा कमी झाला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निदर्शकांना पाठिंबा दर्शवत इराणवर दबाव वाढवला असला, तरी सध्या तरी लष्करी हस्तक्षेपाचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. उलट, वाटाघाटी करून अण्वस्त्र प्रसार रोखणे हेच अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसते.


