विम्बल्डन टेनिस स्पर्धा : क्विटोवा व प्लिस्कोवा यांचे आव्हान संपुष्टात

विम्बल्डन – आश्‍चर्यजनक विजय व विम्बल्डन टेनिस स्पर्धा याचे अतूट नाते आहे. तृतीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा व सहावी मानांकित पेत्रा क्विटोवा यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवास सामोरे जावे लागले. पुरुष गटात 15 वा मानांकित मिलोस राओनिक यालाही पराभवाचा धक्का बसला.

प्लिस्कोवा या चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूला तिचीच सहकारी कॅरोलिना मुचोवा हिने 4-6, 7-5, 13-11 असे संघर्षपूर्ण लढतीनंतर हरविले. हा सामना विलक्षण रंगतदार झाला. मुचोवाने पहिली गेम गमावल्यानंतर खेळावर नियंत्रण राखले. प्लिस्कोवाने अखेरपर्यंत जिंकण्यासाठी झुंज दिली. तथापि मुचोवाने पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ करीत सर्व्हिसब्रेक मिळविला आणि विजयश्री खेचून आणली. स्थानिक खेळाडू योहाना कोन्ता हिने क्विटोवाचा 4-6, 6-2, 6-4 असा पराभव केला. पहिला सेट गमाविल्यानंतर तिने सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळविले. तिने व्हॉलीजचाही कल्पकतेने खेळ केला.

विजेतेपदाची दावेदार असलेल्या सेरेना विल्यम्सने स्पॅनिश खेळाडू कार्ला सोरेझ नॅव्हेरो हिच्यावर 6-2, 6-2 असा धुव्वा उडविला. तिने आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. कोरी गॉफ़ या पंधरा वर्षीय खेळाडूची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित झाली. सिमोना हॅलेप या अनुभवी खेळाडूने तिला 6-3, 6-3 असे हरविले.

अर्जेन्टिनाच्या गुईदो पेला याने राओनिक याच्यावर रोमहर्षक विजय मिळविला. शेवटपर्यंत रंगतदार झालेला हा सामना त्याने 3-6, 4-6, 6-3, 7-6 (7-3), 8-6 असा जिंकला. त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. द्वितीय मानांकित रॉजर फेडररने इटलीच्या बोरेटिनी मॅटिओ याचा 6-1, 6-3, 6-2 असा दणदणीत पराभव केला. नोवाक जोकोविच यानेही एकतर्फी विजय मिळविला. त्याने फ्रान्सच्या उगो ह्युबर्ट याला 6-3, 6-2, 6-3 असे नमविले. त्याने परतीच्या ताकदवान फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. जपानच्या केई निशिकोरीने कझाकिस्तानच्या मिखाईल कुकुशिम याची विजयी घोडदौड 6-3, 3-6, 6-3, 6-4 अशी रोखली.

Leave A Reply

Your email address will not be published.