विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर, नदाल व सेरेना यांची आगेकूच

विम्बल्डन – विजेतेपदाचे दावेदार असलेल्या रॉजर फेडरर व रॅफेल नदाल यांनी पुरुष गटात तर सेरेना विल्यम्स हिने महिला गटात पहिली फेरी जिंकली आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आव्हान राखले. माजी विजेत्या मारिया शारापोवा व गर्बिन मुगुरुझा यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

या स्पर्धेत आठ वेळा अजिंक्‍यपद मिळविणाऱ्या फेडरर याने दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिस याच्यावर 3-6, 6-1, 6-2, 6-2 असा विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये फेडरर याला परतीचे फटके व सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. दुसऱ्या सेटपासून त्याला सूर सापडला व तेथून त्याने वर्चस्व राखले. त्याला येथे द्वितीय मानांकन देण्यात आले आहे.

तृतीय मानांकित व माजी विजेता नदाल याने जपानच्या युईची सुगिता याचा 6-3, 6-1, 6-3 असा धुव्वा उडविला. त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. प्रदीर्घ सामना खेळण्याबाबत ख्यातनाम असलेल्या जॉन इस्नेर याने नॉर्वेच्या कॅस्पर रुड याचा 6-3, 6-4, 7-5 (11-9) असा पराभव केला. तेरावा मानांकित मरीन चिलीच याने फ्रान्सच्या आद्रियन मॅनारिनो याला हरविले.
चुरशीने झालेला हा सामना त्याने 7-6 ()8-6), 7-6 (7-4), 6-3 असा जिंकला. आश्‍चर्यजनक निकाल नोंदविण्याबाबत माहीर असलेल्या डॉमिनिक थिएम याला पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या सॅम क्‍युएरी याने त्याच्यावर 7-6 (7-4), 6-7 (1-7), 6-3, 6-0 असा विजय मिळविला.

महिलांमध्ये सेरेना विल्यम्स हिने इटलीच्या गिऊलिया गातो मोन्टीकोनी हिचा 6-2, 7-5 असा पराभव केला. तिने पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ केला. 2017 मध्ये येथे विजेतेपद मिळविणाऱ्या मुगुरुझा हिला ब्राझीलची अपरिचित खेळाडू बिट्रीझ हदाद मैया हिच्याकडून 4-6, 4-6 अशी हार मानावी लागली. फ्रान्सच्या पॉलीन पार्मेन्टियर हिच्याविरूद्धच्या सामन्यात शारापोवा हिने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यावेळी पॉलीन हिच्याकडे 4-6, 7-6 (7-5), 5-0 अशी आघाडी होती.

अग्रमानांकित ऍशलीघ बार्टी हिने विजयी वाटचाल केली. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने चीनची खेळाडू सैसाई झंग हिच्यावर 6-4, 6-2 असा सफाईदार विजय मिळविला. जर्मनीच्या अँजेलिक कर्बर हिने विजयी सलामी करताना तात्जाना मारिया हिला 6-4, 6-3 असे हरबिले. स्थानिक खेळाडू योहाना कोन्ता हिने रुमानियाच्या ऍना बोग्दान हिच्यावर 7-5, 6-2 अशी मात केली. चौथ्या मानांकित किकी बर्टन्स हिने लक्‍झेंबर्गच्या मॅंडी मिनेला हिचे आव्हान 6-3, 6-2 असे सहज संपविले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.