कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी संपावर असलेल्या कनिष्ठ डॉक्टरांशी आजही राज्य सरकार चर्चा करू शकले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांशी बोलण्यासाठी दोन तास वाट पाहिली मात्र डॉक्टर बोलायला आले नाहीत. या गोंधळावर ममता बॅनर्जी यांनी लोकांच्या हितासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या, लोकांच्या हितासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. मलाही आरजी कार हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या हत्या प्रकरणात न्याय हवा आहे. मी बंगालच्या लोकांची माफी मागते, ज्यांना आशा होती की आरजी कार प्रकरणातील गोंधळ आज संपेल. तत्पूर्वी, बैठकीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याची मागणी करत संपकरी डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यास नकार दिला होता. दोन दिवसांपूर्वी संपकरी डॉक्टरांनी मुख्य सचिवांशी बोलण्यास नकार देत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी केली होती. त्या दिवशीही मुख्यमंत्री सुमारे अडीच तास राज्य सचिवालयात मुख्य सचिवांसोबत थांबल्या होत्या, मात्र डॉक्टरांनी मुख्य सचिवांच्या मेललाही प्रतिसाद दिला नव्हता. मुख्यमंत्री म्हणाल्या की, आजही आम्ही ज्युनिअर डॉक्टरांना भेटण्यासाठी दोन तास थांबलो, पण ते बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत. यासोबतच त्यांनी सांगितले की, आरजी कार प्रकरणातील गतिरोध संपवण्यासाठी ज्युनिअर डॉक्टरांशी बोलण्याचा तीनदा प्रयत्न केला. आमच्याकडे कनिष्ठ डॉक्टरांसोबतच्या बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था होती, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने ते त्यांच्याशी शेअर करू शकलो असतो, परंतु आरजी कार प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, त्यांच्या मागणीनुसार ज्युनिअर डॉक्टरांसोबतची मीटिंग थेट प्रक्षेपित केली जाऊ शकत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलक कनिष्ठ डॉक्टरांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाल्या, मी त्यांना माफ करीन कारण आम्ही वडीलधारी आहोत. ज्युनिअर डॉक्टरांच्या ‘काम बंद’मुळे 27 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यभरातील सात लाख रुग्ण त्रस्त आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.