मुंबई – आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे कराण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जिंतेद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आमच्यासाठी हे मुंबईच आहे, बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे भाजपचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ नाईकांचा आहे. आमच्याकरता बॉम्बे नाही तर ते मुंबईच आहे. बॉम्बेच्या खुणा या मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असले पाहिजे. आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे करण्याची विनंती करणारे पत्र मी स्वतः देशाचे पंतप्रधान आणि मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार असल्याचे ते म्हणाले.