श्रीगोंदा -शहरातील महत्वाचे उपनगर असलेले शिक्षक कॉलनी, शाहू नगर रस्त्याची अवकाळी पावसात दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. संतप्त नागरिकांनी नगरपरिषदेत जाऊन हा रस्ता होईल की नाही? असा सवाल केला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात शिक्षक कॉलनी व शाहूनगर रस्त्याची वाताहत झाली. येथून पायी चालणे सुद्धा कठीण झाले. दाट लोकवस्ती असताना,शहराचे महत्वाचे उपनगर असताना या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. याबाबत नगरपालिकेने वेळोवेळी आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप ही येथील नागरिक करतात. शेवटी वैतागलेल्या नागरिकांनी नुकतेच नगरपरिषदेचे दार ठोठावले आहे. हा रस्ता होईल की नाही? हे एकदाचे सांगावे, असा सवाल काही तरुणांनी केला. यावर पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उत्तर दिले आहे. हा प्रश्न मार्गी लागला नाही तर अधिक आक्रमक व्हावे लागेल, असे मत काही नागरिकांनी दै. “प्रभात’ शी बोलताना व्यक्त केले. यावेळी नगरपरिषदेस निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अमोल निघुल, मंगेश डोके, बंटी तरटे, मयुरेश धारकर, रोहित रणसिंग, मयुरेश चव्हाण, ऋषी गोरे, सागर देशमुख, ओम आवटे, जयेश आनंदकर आदी उपस्थित होते.