Maharashtra Politics : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदासाठी हालचालींना वेग आला आहे. बहुतांश महापालिकांत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पुढील सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती-आघाड्यांच्या हालचाली वेग घेत असतानाच, शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या एकत्रिकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर उद्या सोमवारी धाराशिव येथे दोन्ही शिवसेनांच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याच अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, ठाकरे गटाच्या भूमिकेवर चर्चा केली जाणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपाला एकटे पाडण्यासाठी तिन्ही नेत्यांनी हालचाली सुरू केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.