प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पुणे जिल्ह्यातील मानव-बिबट संघर्ष तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात १२ ऑक्टोबर २०२५ पासून आज अखेर एकूण १७ बिबटे पकडण्यात आले आहेत.या बैठकीस उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, महादेव मोहिते यांसह प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर टोल फ्री क्रमांक १८००३०३३ असलेला नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अतिसंवेदनशील गावांमध्ये एआय प्रणाली, सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, साऊंड अलर्ट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. महत्त्वाचे निर्णय.. जुन्नर वनविभागात २६२ पिंजरे उपलब्ध असले तरी, बाहेरून ७०० पिंजरे उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सीकडून तातडीने पिंजरे खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामसभा घेऊन नागरिकांना माहिती द्यावी आणि ग्रामस्तरावर अनुभवी व्यक्ती, वन आपदामित्र, स्वयंसेवी संस्था यांचा समावेश असलेल्या सहनियंत्रण समित्या गठित कराव्यात. या समित्यांमार्फत ड्रोन सर्व्हे करून बिबट्यांची संख्या नोंदवणे आणि जनजागृती करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पोलिस अधीक्षकांच्या स्तरावर टायगर सेलची बैठक घेऊन समन्वय वाढवण्याचे आदेशही दिले आहेत. बिबट निवारा केंद्रांचा विस्तार.. माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ५० बिबट ठेवण्याची क्षमता असताना सध्या ६७ बिबट आहेत. त्यामुळे बिबट संख्येत वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन, जुन्नर वनविभागात १००० बिबट आणि पुणे वनविभागात ५०० बिबट सामावतील अशा क्षमतांच्या नवीन बिबट निवारा केंद्रांची उभारणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.