मनोधैर्य उंचावलेली राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांशी “दोन हात’ करणार का?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल 15 वर्षे एकहाती सत्ता गाजविणारी राष्ट्रवादी पालिकेतील सत्ता गेल्यानंतर “बॅकफूटवर’ गेली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत एका मतदारसंघात मिळालेला विजय आणि चिंचवडमध्ये अपक्षाच्या रुपाने जनतेने दिलेली साथ यामुळे काही प्रमाणात राष्ट्रवादीचे मनोधैर्य उंचाविले आहे. या उंचावलेल्या मनोधर्यावर पालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांशी दोन हात करणार का? याची चर्चा शहरपातळीवर रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची तब्बल 15 वर्षे सत्ता होती. शहरातील तीनही मतदारसंघात या पक्षाचा दबदबा होता. मात्र चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवित राष्ट्रवादीला “बॅकफूट’वर ढकलले. तर सन 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचेच खंदे समर्थक भाजपात घेत त्यांना विजयी केले. आणि अल्पावधित पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना पराभव पहावा लागला होता. सलग पराभवामुळे राष्ट्रवादीचे नेते “बॅकफूट’वर गेले होते. तर महापालिकेत स्वत:ची दुकानदारी चालविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याऐवजी “समझोता एक्‍सप्रेस’ चालवित होते.

पुन्हा सत्तेत येण्याची स्वप्ने सोडून दिल्यामुळे हा पक्ष गलितगात्र अवस्थेत पोहोचला होता. मात्र विधानसभा निवडणुकीने या पक्षाला चांगलाच आधार दिला. गेल्या पाच वर्षांत वारंवार पराभव पचविणाऱ्या या पक्षाला पिंपरी विधानसभेत दणदणीत यश मिळाले, तर चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटे यांच्या माध्यमातून पक्षाचा गेलेला जनाधार परत मिळविण्यात काही प्रमाणात यश आले. कलाटे हे पराभूत झाले तरी जनाधार मात्र कलाटे यांना राष्ट्रवादीला मिळाल्याचे मताद्वारे समोर आले. त्यामुळे मरगळ आलेल्या या पक्षाला आनंदोत्सव साजरा करण्याची संधी अण्णा बनसोडे यांच्या रुपाने मिळाली.

शहरातील जनाधार काही प्रमाणात का होईना राष्ट्रवादीकडे झुकू लागल्याने या पक्षाचे नेते महापालिकेत खंबीर विरोधी पक्षाची भूमिका घेऊन जनतेच्या प्रश्‍नासाठी आवाज उठविणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी सध्या 38 नगरसेवक आहेत. मात्र यातील बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक सोडल्यास इतरांनी मात्र “भाजपा’सोबत जुळवून घेण्यातच धन्यता मानली आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षांची बांधणी केल्यास तसेच जनतेच्या प्रश्‍नावर पालिकेत आवाज उठविल्यास या पक्षाला यश मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र पक्षाचे नगरसेवक ठाम भूमिका घेणार की पुन्हा “पहिले पाढे पंचावन्न’ म्हणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तरुणांच्या हाती नेतृत्त्व देण्याची गरज
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा तरुण नगरसेवकांच्या हाती दिल्यास या पक्षाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होण्याची शक्‍यता आहे. सध्या अध्यक्ष असलेले संजोग वाघेरे हे विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरीत कमी पडल्याचे बोलले जात आहे. चिंचवडमध्ये त्यांनी लक्ष घालून पक्षाची यंत्रणा कामाला लावली असती तर चित्र वेगळे असते. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाची यंत्रणा शेवटपर्यंत कामालाच लागली नाही. पक्षावर पकड बसविणारा, भाजपाच्या विरोधात काम करणारा आणि जनतेच्या प्रश्‍नांवर धडाडीने काम करणारा तरुण अध्यक्ष दिल्यास शहरात पक्षाला पुन्हा वैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नसल्याची चर्चा पक्षात रंगली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)