Riti Tiwari: ‘मी स्वतःसारखी वागले तर कुटुंबाचं नाव खराब होईल?’ मनोज तिवारींच्या मुलीचा मोठा खुलासा
Riti Tiwari ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने रीतीला गेमबद्दल काही सल्ले दिले. बिग बॉसमधील खेळात तिने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं सलमानने सांगितलं.

Riti Tiwari: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि चर्चेत असलेला ‘बिग बॉस’चा २० वा सिझन सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या सिझनमध्ये भोजपुरी अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारी देखील सहभागी झाली आहे. पहिल्याच ‘वीकेंड का वार’मध्ये रीती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सलमान खानने तिचं कौतुक केल्यानंतर तिच्या मनात अनेक वर्षांपासून असलेली एक खंत समोर आली.
‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने रीतीला गेमबद्दल काही सल्ले दिले. बिग बॉसमधील खेळात तिने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं सलमानने सांगितलं. त्याचवेळी वडील मनोज तिवारी यांची ओळख न वापरता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याने तिचं कौतुक केलं.
सलमानकडून आपलं कौतुक ऐकून रीती भावुक झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. मात्र, सलमान तिथून गेल्यानंतर रीतीला रडू कोसळलं. घरातील सदस्यांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तिने आपल्या मनातील भावना सर्वांसमोर व्यक्त केल्या.
रीतीने सांगितलं की, वडिलांच्या लोकप्रियतेमुळे लहानपणापासूनच तिच्यावर एका वेगळ्या प्रकारचं दडपण होतं. ती मनाप्रमाणे जगू शकत नव्हती. आपण काय बोलतोय, कसं वागतोय आणि लोक आपल्याबद्दल काय म्हणतील, याचा सतत विचार करावा लागत असल्याचं तिने सांगितलं.
रीती म्हणाली की, ‘मनोज तिवारींची मुलगी’ ही ओळख तिच्यासोबत जन्मापासून जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी करताना तिला काळजी घ्यावी लागली. नीट बसा, नीट हसा, बाहेर गेल्यावर व्यवस्थित वागा, काही बोलण्याआधी विचार करा, अशा अनेक सूचना तिला लहानपणापासून दिल्या जात असल्याचं तिने सांगितलं.

रिति तिवारी
मात्र, रीतीला आता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. आपल्याला स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे, असंही तिने व्यक्त केलं. अनेक वर्षांपासून या सगळ्या अपेक्षांचं ओझं मनावर असल्याचं सांगताना रीती भावुक झाली.
तिने पुढे सांगितलं की, तिने या गोष्टी इतक्या खोलवर मनात रुजवून घेतल्या आहेत की, अनेकदा स्वतःच्या भावना व्यक्त करणंही तिला कठीण जातं. मात्र, बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यातील ‘रीती’ला पाहत असल्याची भावना तिला झाली. त्यामुळे सलमानने केलेल्या कौतुकाचा तिच्यावर मोठा परिणाम झाला.
रीतीने आणखी एक महत्त्वाची भावना व्यक्त केली. ती म्हणाली की, जर तिने स्वतःसारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या कुटुंबाचं नाव खराब होईल की काय, अशी भीती तिला वाटते. आपण ज्या कुटुंबातून आलो आहोत, तिथे प्रत्येक गोष्टीकडे लोकांचं लक्ष असतं. त्यामुळे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतानाही मनात भीती असते, असं तिने सांगितलं.
रीतीच्या या भावुक वक्तव्यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी तिला समजावलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच वीकेंड का वारमध्ये तिच्या मनातील भावना समोर आल्याने आता तिच्या पुढील खेळाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मनोज तिवारी यांची मुलगी म्हणून असलेली ओळख आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची इच्छा, या दोन्ही गोष्टींमध्ये रीती कसा समतोल साधते, हे ‘बिग बॉस २०’च्या पुढील भागांमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





