सासवड : पुरंदर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच मतदारसंघाची चर्चा सर्वाधिक रंगत आहे. बेलसर–माळशिरस जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढती होणार आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ ‘हाय व्होल्टेज’ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. बेलसर आणि माळशिरस या दोन्ही पंचायत समिती गणांसह जिल्हा परिषद गटही सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने कोणत्याही उमेदवाराला जातीय आरक्षणाचा अडसर नसून, थेट जनाधार आणि संघटनात्मक ताकदीवरच विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीची ही लढत कमालीची चुरशीची आणि बहुरंगी होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मतदारसंघात सर्वात आधी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद उमेदवारीसाठी हभप. अमोल कामठे यांनी, खळद, नाझरे, पिसर्वे आणि माळशिरस परिसरात प्रभावी जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. महिलांना थेट जोडण्यासाठी त्यांनी विविध गावांत होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन केले. युवकांमध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यत यांसारख्या पारंपरिक आणि सामूहिक सहभागाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले. यातून ‘नवीन नेतृत्व, लोकसहभागी उपक्रम, स्थानिक प्रश्नांवरील सक्रिय भूमिका’ असा संदेश पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष देखील तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. माजी कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे अध्यक्ष विजयराव कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी बेलसर- माळशिरस गटात निवडणूक तयारीला वेग दिला आहे. महिलांमध्ये भावनिक आणि सांस्कृतिक जोड निर्माण करण्यासाठी त्यांनी हळदी- कुंकू समारंभ, देवदर्शन यात्रा, महिला देवदर्शन सहली आयोजित केल्या, तर बैलगाडा शर्यत आणि ग्रामस्तरीय उपक्रमांद्वारे ग्रामसंस्कृतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कोलते कुटुंबाचा शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील वारसा हा त्यांच्या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या स्पर्धेत पक्षातील अन्य वरिष्ठ नेतेही स्वतंत्रपणे सक्रिय आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे यांनी मतदारसंघात देवदर्शन यात्रेची मालिका सुरू केली आहे. त्यातून धार्मिक आणि भावनिक जनसंपर्क साधला जात आहे. स्थानिक पातळीवर अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. झुरंगे यांच्याकडून गडकोट संरक्षण मोहीम राबवली आहे. शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद नियोजन समिती सदस्य रमेश इंगळे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी प्रचाराची दिशा ‘विकासकामे आणि उद्घाटन समारंभ’ यावर केंद्रित केली आहे. गावागावांत सुरू असलेल्या विकासकामांच्या उद्घाटनातून त्यांनी ‘काम करणारे नेतृत्व’ अशी प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रशासकीय नियोजन समितीतील अनुभवाचा फायदा त्यांना प्रचारात होऊ शकतो. दरम्यान, भाजप या मतदारसंघात अद्याप शांत असून उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. पक्षाकडून अधिकृत हालचाली दिसत नसल्या तरी, अंतिम क्षणी भाजप ताकदीने उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, इतर पक्षांनी आधीच ग्रामीण पातळीवर उपक्रमाधारित जनसंपर्क सुरू केल्याने भाजपसमोर वेळेचे आव्हान आहे. देवदर्शनाची मांदियाळी बेलसर– माळशिरस हा गट ग्रामीण मतदार, पारंपरिक उपक्रम, देवदर्शन यात्रा, युवक सहभाग आणि विकासकामे या सर्व घटकांचा संगम असल्याने लढत केवळ दोन उमेदवारांमधील नसून चारही प्रमुख पक्षांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. सामाजिक उपक्रम, जनसंपर्क, विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी यांच्या जोरावर कोण बाजी मारतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काळात बेलसर- माळशिरसचा हा रणसंग्राम अधिकच रंगतदार आणि हाय व्होल्टेज होणार, हे निश्चित आहे. बेलसर – माळशिरस गट (सर्वसाधारण) माणिक झेंडे पाटील दत्तात्रय झुरंगे, गौरव कोलते हभप अमोल कामठे रमेश इंगळे माऊली यादव कैलास कामथे बाळासाहेब कामथे चेतन मेमाणे बेलसर गण (सर्वसाधारण) सुनीता कोलते योगेश कामथे राजेंद्र भोसले धीरज जगताप कैलास जगताप निलेश कृष्णा जगताप रामदास झुरंगे तुषार झुरंगे माळशिरस गण (सर्वसाधारण) पंढरीनाथ सोनवणे संभाजी काळाणे महादेव बोरावके सिध्दनाथ पवार अजिंक्य कड अनिल भगत