मुंबई : दिल्लीतील कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र पोलीस गेल्या तीन वर्षात झालेल्या मोठ्या अपघात, आगी, स्फोट, रसायन आणि सिलेंडर स्फोटांची पुन्हा चौकशी करणार आहेत. जे अपघात म्हणून दाखवले गेले त्या घटनांमध्ये राष्ट्रविरोधी किंवा दहशतवादी घटकांचा सहभाग होता का, हे पोलीस तपासणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी सर्व शहरांच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांना हे निर्देश दिले आहेत. लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटानंतर श्रीनगर पोलिसांनी व्हाइट कॉलर मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन कट्टरतावादावर पोलिस लक्ष ठेवतील. पोलिसांच्या सोशल मीडिया शाखा सतर्क आहेत आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवतील. पोलिसांना ऑनलाइन कट्टरतावाद निर्माण करणाऱ्या गटांबद्दल माहिती गोळा करण्याचे आणि पीएफआय, सिमी आणि एसडीपीआय सारख्या संघटनांच्या माजी सदस्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सूचनांनुसार, बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक किंवा राष्ट्रविरोधी घटकांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून बांधकाम साइटवरील कामगारांची चौकशी केली जात आहे. पोलिस महाराष्ट्रातील काश्मिरी विद्यार्थ्यांची पडताळणी देखील करतील आणि प्रमुख शहरांमध्ये राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची अद्ययावत यादी तयार करतील. पोलिसांनी काश्मिरी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी तपासावी आणि अद्ययावत माहितीसाठी शैक्षणिक संस्थांशी संपर्क ठेवावा यावर या निर्देशांमध्ये भर देण्यात आला आहे.