अंबरनाथ : अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. भाजपला साथ देणाऱ्या 12 नगरसेवकांचा आता अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसने या 12 नगरसेवकांचे थेट निलंबन केले आहे. पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवताच हे सर्व नगरसेवक आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच हाती कमळ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथच्या सत्तेत मोठी उलथापालथ होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह 12 नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या कारवाईचे पत्र जारी केले आहे. पक्षात राहून भाजपला साथ देणे या नगरसेवकांना महागात पडले असले, तरी आता त्यांनी आपला मोर्चा पूर्णपणे भाजपकडे वळवला आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे 15 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले होते. या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 सदस्यांना सोबत घेऊन अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आणि सत्तेचे गणित जुळवले. या विचित्र युतीमुळे 28 नगरसेवक असूनही शिंदेसेनेला सत्तेपासून लांब राहावे लागले होते.