पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

Shivsena Party | शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आता आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाच्या या विधानामुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी ही निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. याबाबत आज सुनावणी झाली.
निवडणूक चिन्हाची कायदेशीर लढाई महत्त्वाच्या टप्प्यावर
हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता याप्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. मात्र, अद्याप त्यांनी तारीख निश्चित केलेली नाही. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दाखवली. त्यामुळे आता निवडणूक चिन्हाची कायदेशीर लढाई महत्त्वाच्या टप्प्यावर आली असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता ऑगस्ट महिन्यात याचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने ठाकरे गटाला निवडणुकीआधी दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Shivsena Party |
तर दुसरीकडे, निवडणूक चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत होईल असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यात ऑक्टोबरच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधी निकाल येण्याची शक्यता असल्याचे अॅड. शिंदे यांनी म्हटले. Shivsena Party |




